बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०

मराठी भाषा आणि मराठी माणूस..

मराठी भाषा आणि मराठी माणूस..


     आज २७ फेब्रुवारी ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर  यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. १९८७ साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यानंतर शासनाने हा दिवस गौरव दिन म्हणून जाहीर केला. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला. आणि आज संपूर्ण महाराष्ट्रासह देशात आणि जगाच्या काही ठिकाणी जागतिक मराठी दिवस साजरा केला जातो.
  
  मराठी भाषा ही २००० ते २५०० वर्षापेक्षा जुनी आहे. जगात १० वा क्रमांक आणि भारतात ३ रा क्रमांक लागतो.
महाराष्ट्रची राजभाषा असेलेल्या मराठी राज्यात खासकरून मुंबई, पुणे सारख्या शहरात आज मराठीची गळचेपी होताना दिसत आहे. मेट्रो, रेल्वे , आणि इतर सार्वजनिक ठिकाणी सर्रास मराठी डावलली जात आहे. केंद्राच्या त्रिभाषा सूत्रानुसार प्रतेक ठिकाणी मराठी असणे गरजेचे आहे. जर एखादी भाषा वाढवायची असेल तर तिचा व्यवहारात वापर होणे गरजेचे आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरात मराठी माणूस फक्त घरी मराठी बोलतो परत इतर ठिकाणी जास्त हिंदीचा वापर करतो. समोरची व्यक्तिला मराठी येत नाही असा विचार करून तो फक्त हिंदी बोलतो. रेल्वे,बस, मेट्रो मधून प्रवास करताना हिंदीच वापरतो. थोडक्यात म्हणायच झालं तर मुंबईकरांसाठी फक्त घरी मराठी आणि घराबाहेर हिंदी. लोकल मधून प्रवास करताना सुद्धा १० मित्र असतील तर त्यातील एकदोन इतर भाषिक असतात परंतु बाकीचे आठ जन त्या दोघांना कळाव म्हणून हिंदी भाषा बोलतात. अश्याने ते दोघे मराठी शिकतील का ? आपण आपल्या राज्यात आहोत की ते आपल्या राज्यात आलेत त्यामुळे त्यांनी मराठी शिकली पाहिजे की आपण हिंदी? आपण या गोष्टीचा कधीच विचार करत नाही. आपणच त्यांना मराठी शिकण्याची गरज नाही अस नकळत दाखउन देतो. आपण कधी स्वत:ला प्रश्न विचारला आहात का,  की आपण आपण आपली मराठी मातृभाषा असताना हिंदीत का बोलतो ? सगळ्या भाषा शिकाव्यात ती काळाची गरज आहे परंतु कोणती भाषा कुठे वापरायची हे आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे.  एखाद्या दुकानात खरेदी करताना तोंडातून चटकन हिंदी येते अस का? आपली मातृभाषा मराठी आहे त्यात बोललो तर काय फरक पडतोय याचा विचार आपण करतो का ?  आपण जेवढी मराठी आपल्या व्यवहारात वापरू तेवढा तिचा जास्त प्रचार, प्रसार होणार आहे हे आधी प्रतेक मराठी माणसाने मराठी भाषिकाने ओळखलं पाहिजे. कोणत्याही व्यक्तीशी संवाद करताना आपण सुरवात हिंदीत का करतो ? समोरच्या व्यक्तिला मराठी येतच नाही अस आपण का समजतो ? मुंबई, पुणे यांसारख्या शहरात मराठीची गळचेपी होण्यास मराठी माणूसच जबाबदार आहे कारण त्यांनी त्याची मराठी मातृभाषा ही फक्त घरापुरती मर्यादित ठेवली आहे.
 
    एखाद्या समारंभात किंवा सण - उत्सवात आपण हिंदीच  गाणी का लावतो याचा विचार कधी आपण केला आहे का? मराठीतही सुंदर सुंदर गाणी असताना हिंदीच का ? इथेच आपण चुकतो आणि आपल्या नकळत आपण मराठीला दुय्यम स्थान देतो. दहीहंडी , गाणेशोत्सव यांसारख्या मराठी सणांत मराठी माणूस हिंदी गाण्यावर नाचत असतो.   उत्तम मराठी चित्रपट असताना आपला हिंदी चित्रपटांकडे वळतो आणि मराठी चिटपटाला चित्रपटगृह मिळाले  नाही की आरडाओरडा करतो.मराठी चित्रपट किती उत्तम असतात हे नागराज मंजुळे यांच्या सैराट सारख्या सिनेमाने दाखऊन दिले आहे. अनेक मराठी चित्रपट हे उत्तम आहेत आणि आपण ते पाहिले पाहिजेत. फक्त तो मराठी आहे अस समजून आपण तो न पाहता हिंदीकडे वळतो आणि इथेच आपण चुकतो.   
 
   मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे त्यामुळे इथून आपण मराठीचा प्रचार केला तर संपूर्ण देशात मराठीचं जाळं पसरेल.  प्रत्येक मराठी माणसाला मराठीबद्दल खूप गर्व, अभिमान असतो पण तो फक्त  घरापुरता मर्यादित ठेऊन कसं चालेल? सातासमुद्रापार मराठीला पोहचवायची असेल तर व्यवहारात किंवा आपण जिथे जाऊ तिथे मराठी वापरण गरजेचं आहे. जिथे जिथे मराठी नसेल तिथे मराठीची मागणी केली पाहिजे. उदा. बँक, रेल्वेस्थानक, मेट्रो किंवा इतर ठिकाणी मराठी डावललो जात असेल तर त्यासंबंधित तिथल्या अधिकार्‍याला निदर्शनास आणून दिले पाहिजे किंवा त्यासंबधीची रीतसर त्या अधिकार्‍याकडे तक्रार केली पाहिजे आणि मराठीची मागणी केली पाहिजे.  प्रत्यक्षात अस करणे शक्य नसल्यास शोशल मीडियाच्या माध्यमातून उदा. फेसबूक, ट्वीटर, मेल  यांच्या माध्यमातून आपण तक्रार करून तिथे मराठी हवी हे आपण दाखऊन देऊ शकतो. या अश्या अनेक मार्गातून आपण मराठीची होणारी गळचेपी थांबवू  शकतो.  त्यामुळे  आपल्याला मराठी वाढवायची असेल तर सुरवात आपण आपल्यापासून केली पाहिजे. प्रतेक मराठी माणसाने मराठी ,ऐकण, पाहणं, बोलल पाहिजे. फक्त घरीच मराठी न बोलता सार्वजनिक ठिकाणी सुद्धा मराठी बोलले पाहिजे. 

सर्वांना जागतिक मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा.. 
 - मंगेश काजवे
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा